अमेरिका-इराण युद्धाचा भडका! २४ तासांत भारतीय शेतकऱ्यांचं २,००० कोटींचं नुकसान
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
iran-America War : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका–इराण संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. या परिस्थितीचा थेट फटका भारताच्या कृषीमाल निर्यातीला बसला आहे.
मुंबई : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका–इराण संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. या परिस्थितीचा थेट फटका भारताच्या कृषीमाल निर्यातीला बसला आहे. सध्या फळे, भाजीपाला आणि इतर कृषी उत्पादनांची हवाई मार्गे होणारी निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही स्थिती अशीच कायम राहिली, तर येत्या महिन्यात आंबा निर्यातीवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यापारी आणि निर्यातदार व्यक्त करत आहेत.
आखाती व्यापार साखळीवर युद्धाचा परिणाम
भारतामधून संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कुवेत, कतार, बहरीन, इराक, जॉर्डन, इराण आणि इस्त्रायल या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळे, भाजीपाला आणि कृषी उत्पादनांची निर्यात केली जाते. त्याचबरोबर या देशांतून भारतात खजूर, सुकामेवा आणि इतर अन्नपदार्थांची आयात होते.
गत आर्थिक वर्षात आखाती देशांबरोबर भारताची सुमारे २००८ कोटी रुपयांची निर्यात आणि ६६७० कोटी रुपयांची आयात झाली होती. चालू आर्थिक वर्षातही निर्यात-आयात व्यवहार समाधानकारक गतीने सुरू होते. मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे ही साखळी अचानक खंडित झाली असून, विशेषतः हवाई मार्गे होणारा व्यापार पूर्णपणे थांबला आहे.
advertisement
हवाई निर्यात बंद, समुद्री मार्गावरही धोक्याची छाया
सध्या विमानसेवा अनिश्चित झाल्याने ताज्या फळे व भाजीपाल्याची निर्यात करणे अशक्य झाले आहे. जरी समुद्री मार्गावरील व्यापार सुरू असला, तरी संघर्ष दीर्घकाळ चालल्यास जहाज वाहतुकीवरही परिणाम होण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः वेळेवर पोहोचणे आवश्यक असलेल्या नाशवंत मालासाठी हा मोठा धोका मानला जात आहे.
advertisement
खजूर आयातीवर संकट
पुढील पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणावर खजूर आयात होण्याची अपेक्षा होती. मात्र युद्धामुळे या आयातीवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या रमजान महिना सुरू असल्याने खजूराची मागणी मोठी असते. आयात कमी झाल्यास मुस्लीम बांधवांच्या उपवासावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यापारी व्यक्त करत आहेत.
निर्यातदारांमध्ये वाढती अस्वस्थता
बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले की, “आखाती देशांमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणावर फळे आणि भाजीपाला पाठवला जातो. सध्याची युद्धस्थिती कायम राहिली, तर केवळ निर्यातच नव्हे तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम होईल.”
advertisement
विशेषतः आंबा हंगाम तोंडावर असताना हवाई वाहतूक पूर्ववत न झाल्यास निर्यातदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने पर्यायी वाहतूक व्यवस्था आणि व्यापार सुलभतेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निर्यातदार संघटनांकडून केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 8:13 AM IST







