पिंपरी चिंचवड शहरात महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या तुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी जाहीर करण्याआधीच प्रचाराचा नारळ फोडून संभाव्य उमेदवाराच्या प्रचारात सभा घेण्याचे अजित पवार यांचे नियोजन आहे. रविवारी सायंकाळी पिंपरी चिंचवड दौऱ्यात स्थानिक गणितांना आकार देऊन उमेदवारांच्या नावांवर अजित पवार शिक्कामोर्तब करतील.
advertisement
कोणत्या उमेदवारांचा प्रचार?
उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच आपल्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री अजित पवार करतायेत. प्रभाग क्रमांक १ चिखली, म्हेत्रेवस्ती, ताम्हणेवस्ती, मोरेवस्तीमधील संभाव्य उमेदवार विकास साने, यश साने, साधना नेताजी काशीद, संगीता ताम्हाणे या चार उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ अजित पवार फोडतील.
तर प्रभाग क्रमांक १२ रुपीनगर, तळवडे, ज्योतिबा नगर, गणेशनगरमधून शरद भालेकर, पंकज भालेकर, चारुलता सोनवणे, सीमा भालेकर या संभाव्य उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आज अजित पवार सायंकाळी फोडणार आहेत.
दुसरीकडे अद्याप दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या निर्णयावर अद्यापही निर्णय झालेला नसताना अजित पवार हे राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ करतायत. त्यामुळे या दोन्ही प्रभागात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार तर नाहीत ना की आधीच तडजोड करण्यात आलीय? अशी शंका निर्माण झाली आहे.
