तपासात चार पैलूंवर भर
सूत्रांच्या माहितीनुसार, तपास यंत्रणा प्रामुख्याने खालील चार गोष्टींवर भर देत आहेत. यातील पहिली गोष्ट म्हणजे दृश्यमानता. अपघाताच्या वेळी बारामती विमानतळ परिसरात दाट धुके होते. दृश्यमानता केवळ ८०० ते ३००० मीटर असतानाही वैमानिकाने लँडिंगचा निर्णय का घेतला?
दुसरी बाब म्हणजे वैमानिकाला लँडिंगसाठी 'क्लिअर कमांड' दिली गेली होती का, की सिस्टिममध्ये काही तांत्रिक गोंधळ झाला होता? तिसरी गोष्ट म्हणजे अप्रोच आणि लँडिंग दरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये किंवा नियंत्रण प्रणालीत अचानक काही बिघाड झाला होता का? चौथी गोष्ट म्हणजे दुसऱ्या प्रयत्नात विमानाचा लँडींग अँगल चुकला आणि ते धावपट्टीऐवजी बाजुला जाऊन कोसळलं का? हा निर्णय कुणाचा? या अनुषंगाने तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
advertisement
तपासात असे समोर आले आहे की, पहिल्या प्रयत्नात दृश्यमानता कमी असल्याने वैमानिकाने 'गो-अराउंड' करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टी दिसत नसतानाही लँडिंग करण्याचा धोका का पत्करण्यात आला, विमान लँडिंग करण्याचा शेवटचा निर्णय कुणी घेतला? वैमानिकाने घेतला की त्यांना तशी कमांड देण्यात आली? या अनुषंगाने तपास केला जात आहे.
ब्लॅक बॉक्स आणि सीआयडी चौकशी
विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' सध्या दिल्लीतील प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आला असून, त्यातील डेटा लवकरच समोर येईल. दुसरीकडे, महाराष्ट्र CID ने देखील या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, अजित पवारांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची ४ तास चौकशी करण्यात आली आहे. या दौऱ्याचे नियोजन आणि विमानाची निवड कोणी केली, याचा तपास सध्या सुरू आहे.
