एमआयएमचे नेते युसुफ पुंजाजी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले असून, एमआयएमच्या उमेदवारांना विश्वासात न घेता ही युती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अकोट येथील आघाडीतील नगरसेवकांनी ‘अकोट विकास मंच’ स्थापन केल्याचा सुरुवातीला बोलण्यात आले होते. मात्र यामध्ये युतीचे घटक पक्ष दिसून आल्याचं ते म्हणाले. या सर्व घडामोडींनंतर एमआयएम या युतीतून बाहेर पडल्याचे युसुफ पुंजाजी यांनी स्पष्ट केलं आहे.
advertisement
एमआयएम पक्षासोबत नव्हे, तर केवळ उमेदवारांशी युती केली होती, भाजपचा हास्यास्पद दावा
दरम्यान, भाजपकडूनही या युतीबाबत काहीशी माघार घेतल्याचं चित्र दिसत आहे. एमआयएम पक्षासोबत नव्हे, तर केवळ उमेदवारांशी युती केल्याचा दावा भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे. भाजपची विचारधारा मान्य करून एमआयएम पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपासोबत येणाऱ्या उमेदवारांशीच युती कायम ठेवली जाईल, असंही सावरकर यांनी स्पष्ट केलं आहे.
आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये? रविंद्र चव्हाण यांचे खरमरीत पत्र
दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही एमआयएमसोबत युती केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घडामोडींमुळे अकोट नगरपरिषदेतील सत्तास्थापनेचा पेच अधिकच वाढला असून, राजकीय वातावरण तापले आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये आपण अकोट नगरपरिषद मध्ये AIMIM सोबत युती करून, भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला आहे. तसेच असे करीत असताना कोणालाही विश्वासात न घेता आपल्या या कृतीतून पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत आपण तातडीने खुलासा करावा, असे रविंद्र चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.
