संघपाल खंडारे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो अकोला जिल्ह्यातील अकोट फाईल पोलीस स्टेशन हद्दीतील शंकरनगर येथील रहिवासी आहे. संघपाल याने सात वर्षांपूर्वी शबनम फातिमा हिच्याशी आंतरधर्मीय विवाह केला होता. त्यांना एक सहा वर्षांची मुलगीही आहे. सुरुवातीला सर्वकाही ठीक होतं. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू झाले.
advertisement
आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
सोमवारी रात्री पती-पत्नीत झालेल्या वादानंतर, संघपालने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या मोठ्या भावाला पाठवला. यात त्याने म्हटले की, " दादा, हा व्हिडीओ पोलिसांना दाखव. माझ्या मृत्यूला माझी पत्नी शबनम फातिमा, तिची आई, भाऊ आणि इतर नातेवाईक जबाबदार आहेत. त्यांनी मला पायल इलेक्ट्रॉनिक्सजवळ बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याचे पुरावे सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळतील."
या व्हिडिओमध्ये संघपालने पत्नीच्या आग्रहावरून तीन लाखांचे कर्ज काढल्याचेही सांगितले आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला आणि जीविताच्या धोक्याला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं त्याने म्हटलं आहे.
पोलिसांची कारवाई आणि तपास
व्हिडिओ पाठवल्यानंतर काही वेळातच, बाळापूर तालुक्यातील पारस गावाजवळ अकोला-अमरावती रेल्वेमार्गावर संघपालचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संघपालच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.