काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी आणि संगमनेर मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोपावर संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी जोरदार पलटवार केला आहे. निवडणूक आयोगावर ताशेरे ओढून तुमचा पराभव झाकला जाणार नाही. चाळीस वर्ष निवडून आलात तेव्हा लोकशाही होती का? असा सवाल खताळ यांनी विचारला आहे.
advertisement
दोन मतदारसंघातल्या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर बाळासाहेब थोरातांची शंका
राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही शिर्डी आणि संगमनेर मतदारसंघात निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केल्यानंतर संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी थोरात यांना ऐकवले.
थोरातांनी वैफल्यातून आरोप केले, आरोपात कुठलेही तथ्य नाही
बाळासाहेब थोरात यांचे आरोप म्हणजे वैफल्यातून केलेले आरोप असून त्यांच्या आरोपात कुठलेही तथ्य दिसत नाही. केवळ आपल्या कार्यकर्त्यांना अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी केलेला त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका आमदार अमोल खताळ यांनी थोरात यांच्यावर केलीय.
तुम्ही ४० वर्ष निवडून आला, तेव्हा लोकशाही होती मग आता...
बाळासाहेब थोरात यांचे आरोप हास्यास्पद असून ४० वर्ष तुम्ही निवडून आलात तेव्हा तुम्हाला लोकशाही जाणवली. आता पराभव झाला तर तो मोठ्या मनाने मान्य करायला पाहिजे. आयोगावर ताशेरे ओढून तुमचा झालेला पराभव झाकला जाणार नाही, अशा शब्दात अमोल खताळ यांनी थोरात यांना ऐकवले.