कल्याणी कोमकर यांनी पत्रकार परिषद घेत आंदेकर कुटुंबाला विरोध केला आहे. आंदेकर कुटुंबाला जो पक्ष तिकीट देईल, त्या पक्षाच्या कार्यालयासमोर जाऊन आत्मदहन करणार आहे, असा इशाराही कोमकर यांनी दिला.
आंदेकर कुटुंबाला असलेल्या विरोधाबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, माझा सगळ्यांनाच विरोध आहे. मूळ म्हणजे बंडू आंदेकरांना. ते माझे सख्खे वडील असून माझ्या मुलाचे आजोबा आहेत. तरी त्यांनी असं पाऊल उचललं. त्यामुळे मला त्यांच्याविषयी आता काही वाटत नाही. त्यांनी जेव्हा माझ्या मुलाला मारलं. तेव्हाच सगळी नाती संपली. आता मला त्यांच्याविषयी काहीच वाटत नाही.
advertisement
आंदेकरांना तिकीट मिळालं तर भूमिका काय असणार? असं विचारलं असता कल्याणी कोमकर म्हणाल्या, जो पक्ष त्यांना तिकीट देईल, त्यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर मी आत्मदहन करेन. हे मी खरंच करणार आहे. जिथं माझा मुलगा नाही, तिथं मला पण जगण्याची इच्छा नाहीये. आम्ही काहीही केलं नसताना तुम्ही आमच्या मुलाला मारलं. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. घर सुनं केलं. त्यामुळे मी शांत बसणार नाही. मी आत्मदहन केलं तर याला आंदेकरांना तिकीट देणारा पक्षच जबाबदार असणार आहे.
तुम्हाला पक्षानं तिकीट दिलं नाही तर तुम्ही अपक्ष निवडणूक लढणार का? असं विचारलं असता कोमकर पुढे म्हणाल्या, अपक्ष लढणं सोपी गोष्ट नाही. आमच्याकडे पॉवर नाहीये. आमची लोकही बाहेर नाहीयेत. त्यामुळे मी काही निर्णय घतला नाही. आम्हाला तिकीट द्यावं, एक संधी द्यावी, मी अन्यायाविरोधात लढण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे लोकांनी माझी तळमळ समजून घ्यावी. एका आईच्या पाठीशी उभं राहावं.
गणेश कोमकर फॉर्म भरणार का? यावर कल्याणी कोमकर म्हणाल्या, "ते फॉर्म भरणार आहेत की नाही, हे मी आता सांगू शकणार नाही. आमचं झालं तर फॉर्म भरू. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. तयारी केली आहे. आंदेकरांना परवानगी दिली म्हणजे आम्हाला पण परवानगी द्यायला पाहिजे ना... मी तसा अर्ज केला आहे. माझ्या पतीनं काहीही केलं नाही, आण्णांनी त्यांना गोवलं आहे. आम्ही आमच्या भावाची सुपारी का देऊ, यात आम्ही काही केलं नाही. आम्हाला यातून काय फायदा होणार आहे. असं कुठली बहीण करेन, असं आम्ही केलं नाही आणि केलं असेल तर कुणी बघितलं? अजून एकही पुरावा नाही भेटला. तरी आम्ही वर्षभरापासून भोगतोय."
