मुंबईत महायुतीत दोस्तीत कुस्तीला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या भाच्याला राष्ट्रवादीने प्रवेश दिलाय तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या माजी महामंत्र्याला देखील राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याचे ठरविले आहे. निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडी आणि पक्ष प्रवेशांच्या घडामोडीला वेग आला आहे.
शिंदे यांच्या मेहुणीचा मुलगा राष्ट्रवादीत, मनगटावर घड्याळ बांधलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेहुणीचा मुलगा म्हणजेच त्यांचा भाचा आशिष माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत आशिष माने यांचा प्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आशिष माने यांना चांदिवली मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १५९ मधून उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले.
advertisement
राष्ट्रवादीचा मित्रपक्षांनाच दणका
भारतीय जनता पक्षाच्या माजी महामंत्री नेहा राठोड यांना प्रभाग क्रमांक १५६ मधून उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादीने निश्चित केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश घडवून आणत उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने मित्रपक्षांनाच दणका दिला आहे.
मुंबई महायुतीचं काय? कोण किती जागांवर लढणार, अद्याप गुलदस्त्यात
मुंबईत महायुतीचे काय होणार, कोण किती जागांवर लढणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची २० ते २५ जागांची मागणी आहे. परंतु राष्ट्रवादी जर नवाब मलिक यांच्या नेतृत्वात लढली तर त्यांना युतीत घेण्यास भाजपचा विरोध असल्याने आता शिंदेसेना आणि भाजपची युती झाली आहे. पुढच्या २४ तासांत कोण किती जागांवर आणि कोणत्या जागांवर लढणार, हे स्पष्ट होईल.
