अमरावती :
6 डिसेंबर हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या दिवसाचे औचित्य साधून देशभरात त्यांच्या स्मृतींना व विचारांना उजाळा देण्यासाठी विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. अमरावती जिल्ह्यातील यशोदा नगर परिसरातील भीम टेकडी हे असेच एक ठिकाण आहे, जिथे बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हजारो अनुयायी उपस्थित राहतात.
advertisement
भीम टेकडीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ११ फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची भव्य मूर्ती देखील आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि शांतताप्रिय वातावरणामुळे हे ठिकाण डॉ. बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी योग्य मानले जाते.
विशेष कार्यक्रम
भीम टेकडीवर दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्ध उपासक संघातर्फे आदरांजलीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. संघाचे अध्यक्ष अनिल वानखेडे यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी अनेक अनुयायी एकत्र येतात. याचबरोबर नवीन उपक्रम राबवले जातात. लोकांचा सहभाग वाढावा यासाठी विविध उपक्रमांमध्ये नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.
या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्यही पर्यटकांना भुरळ घालते. 6 डिसेंबरला बाबासाहेबांना आदरांजली देण्यासाठी येथे आलेले लोक परिसरातील शांततेत रमून जातात. बाराही महिने इथे नागरिक व पर्यटक भेट देत असतात.
डॉ. बाबासाहेबांचा पुतळा आणि परिसर
अनिल वानखेडे सांगतात की, ११ फूट उंच बाबासाहेबांचा पुतळा लोकवर्गणीतून उभारण्यात आला आहे. पाच वर्षांपूर्वी हा पुतळा बसवण्यात आला होता. लोकांच्या सहकार्यामुळे भीम टेकडी परिसरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी येथे अभ्यासिकेचीही सोय आहे, जिथे अनेक विद्यार्थी शांततेत अभ्यासासाठी येतात.
परिसर शांत असूनही देखणा आहे. भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर टेकडीवरून अमरावती शहराचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते. बाबासाहेबांची विविध पुस्तकेही येथे उपलब्ध आहेत, ज्यामुळे वाचकांसाठीही हे ठिकाण विशेष ठरते.
येत्या 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी अमरावतीच्या भीम टेकडीला भेट द्या.