कोल्हापूर विमानतळ झपाट्याने विकसित होत आहे. सध्या कोल्हापुरातून मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, तिरुपती आणि अहमदाबाद या मार्गावर प्रवासी विमानसेवा सुरू आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून दोन मार्चपासून कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळी विमानसेवा सुरू होत आहे. दर मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता मुंबईतून स्टार एअरवेजचे विमान कोल्हापूरच्या दिशेने उड्डाण करेल, आणि पाच वाजून ३५ मिनिटांनी हे विमान कोल्हापुरात येईल. तर सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून पुन्हा मुंबईच्या दिशेने विमानाचे उड्डाण होईल आणि सात वाजून दहा मिनिटांनी हे विमान मुंबईला पोहोचेल.
advertisement
प्रवाशांची होणार मोठी सोय
2 मार्चपासून ही नवी प्रवासी हवाईसेवा सुरू होत असून, पहिल्या टप्प्यात दर मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळच्या सत्रातील स्टार एअरवेजचे विमान प्रवासी सेवा देईल. लवकरच आठवड्यातील सातही दिवस सायंकाळच्या सत्रातील कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न असेल, तसेच सायंकाळी साडेचार ऐवजी सायंकाळी सात-साडेसात नंतर मुंबईहून विमान उड्डाण करेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले आहे. मात्र तूर्तास तरी कोल्हापूर मुंबई कोल्हापूर या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळी विमानसेवा सुरू होत असल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
