'मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे,' असं ट्वीट बावनकुळे यांनी केलं आहे.
संजय राऊतांचे खळबळजनक आरोप
पहिले ट्वीट करून बावनकुळेंचा फोटो शेअर केल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. 'महाराष्ट्रातील नेते दिसत आहेत, हे मी ऐकलं. मी कुणाचं नाव घेतलं नाही. जो व्यक्ती आहे त्यांनी सांगावं की ते नाहीत किंवा पक्षाच्या लोकांनी सांगावं. तेलगीने एका रात्रीत 1 कोटी उडवले हे माहिती, मकाऊमध्ये एक माणूस साडेतीन कोटी उडवतो, म्हणजे अच्छे दिन आले,' असा टोला संजय राऊतांनी लगावला.
'रेस्टॉरंटला जातात आणि साडेतीन कोटी उडवतात. साडे तीन कोटींचे कॉईन तीन टप्प्यात विकत घेतात. मी कुणाच्या व्यक्तीगत आनंदावर विरजण घालू इच्छित नाही, महाराष्ट्रात काय सुरू आहे, दुष्काळाची परिस्थिती आहे. मी कोणाचं नाव घेतलं नाही, पण ते म्हणतात कुटुंबासोबत गेले होते, चायनीज फॅमिली आहे का? माझ्याकडे 27 फोटो आहेत, व्हिडिओदेखील आहेत. तुम्ही जेवढं खोटं बोलाल तर अजून उघडे पडाल. तुमच्याकडे भारतात ईडी सीबीआय असतील, आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी सीबीआय आहे, साडेतीन कोटी डॉलर्समध्ये व्यवहार झाले. टोळधाड बंद करा, नाहीतर तुम्हाला दुकान बंद करावं लागेल. तीन तासात साडेतीन कोटी खर्च केलेत,' असा आरोपही संजय राऊतांनी केला.
'कुटुंब खोलीत आहे, आपण खाली आहात, कुटुंबाच्या गोष्टी करू नका. मी वैयक्तिक टीका करत नाही,' असंही संजय राऊत म्हणाले.
