नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रणजितसिंग तबेलेवाले उर्फ रज्जा (वय ३५) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. शनिवारी मध्यरात्री जुन्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. यावेळी दोन हल्लेखोरांनी धारदार तलवारीने रणजितसिंगवर सपासप वार केले. या हल्ल्यात रणजितसिंग गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनेची माहिती मिळताच वजिराबाद पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
advertisement
पोलिसांची तत्पर कारवाई: दोन आरोपी गजाआड
या घटनेनंतर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे ५ एप्रिल रोजी पहाटेच दोन्ही आरोपींना अटक केली.
मनप्रितसिंग परविंदरसिंग काचवाले (२३ वर्षे) आणि परमज्योतसिंग परविंदरसिंग काचवाले (२५ वर्षे) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. हे दोन्ही आरोपी अबचलनगर, नांदेड येथील रहिवासी आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. नांदेडमध्ये आधीच तिहेरी हत्याकांडाची घटना घडली असताना आणखी एका तरुणाची हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याचा तपासही पोलीस करत आहेत.
