मुंबईतील अनेक प्रभागांत अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांनी दावा सांगितल्याने उमेदवारी देताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा चांगलाच कस लागला. दादर, माहीम, लालबाग परळ, वरळी आदी मराठी बहुल भागांत उमेदवारीसाठी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात इच्छुक होते. गेल्या दोन चार दिवसांपासून उमेदवारांच्या नावांवर चर्चा करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अनेक बैठका झाल्या. अखेर अर्ज भरायला काही तास शिल्लक असताना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले.
advertisement
कुठे कुणाला उमेदवारी?
प्रभाग क्रमांक १९९ चे प्रतिनिधित्व किशोरी पेडणेकर करतात. याच प्रभागातून निवडून येत त्या मुंबईच्या महापौर देखील राहिल्या. परंतु या भागातील शिवसेना शाखाप्रमुख गोपाळ खाड्ये यांची पत्नी अबोली खाड्ये यांनी यंदा दावा सांगितला होता. गेली ३५ वर्षे आम्ही काम करतोय, यंदा आम्हाला न्याय हवा म्हणत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या उमेदवारीचे काय होणार? असा पेच निर्माण झाला होता. अखेर शेजारील प्रभागात म्हणजेच १९८ मधून अबोली खाड्ये तर १९९ मधून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली. प्रभाग क्रमांक १९६ मधून आशिष चेंबूरकर यांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात असतील.
कोण आहे अबोली गोपाळ खाड्ये?
-अबोली खाड्ये या शिवसेना शाखाप्रमुख गोपाळ खाड्ये यांच्या पत्नी आहेत
-लोअर परेल, करी रोड भागात गोपाळ खाड्ये गेली अनेक वर्षे शाखाप्रमुख म्हणून काम करतात
-जनसामान्यांचा कोणताही प्रश्न असो गोपाळ खाड्ये अडी अडचणीला धावून जातात
-परंतु यंदा प्रभाग क्रमांक १९९ महिलेसाठी राखीव झाल्याने गोपाळ खाड्ये यांच्याऐवजी त्यांची पत्नी अबोली खाड्ये यांना उमेदवारी देण्यात आली
-शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर अनेक शाखाप्रमुख, माजी नगरसेवक ठाकरेंना सोडून गेले पण गोपाळ खाड्ये ठाकरेंसोबतच राहिले
-त्यांच्या निष्ठेचे फळ त्यांना मिळाल्याचे शिवसैनिक सांगत आहेत
