‘भैरव’चा अपभ्रंश होऊन ‘बहिरम’
अमरावतीपासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या बहिरम गावाला सुमारे 350 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार, शंकर-पार्वती प्रवासात असताना या ठिकाणी मुक्काम केल्याची आख्यायिका आहे. या जागेचं सौंदर्य आणि शांतता पार्वतीला विशेष भावली आणि त्यामुळे दरवर्षी येथे येण्याची इच्छा तिने व्यक्त केली. त्यावेळी भगवान शंकरांनी माझा एक अंश येथे सदैव वास करेल असे सांगितल्याची कथा सांगितली जाते. शंकरांचा भैरव अवतार आणि त्यावरूनच भैरवचा अपभ्रंश होऊन ‘बहिरम’ हे नाव रूढ झाल्याचे मानले जाते.
advertisement
तलावात स्वयंपाकासाठी भांडी उपलब्ध होती...
या ठिकाणी शंकर-पार्वती यांनी तीन दिवस मुक्काम केला होता. त्यांच्या स्नानासाठी खास काशीहून पाणी आणण्यात आले, त्यामुळे येथे असलेला काशी तलाव आजही श्रद्धेचं केंद्र मानला जातो. जुन्या काळात या तलावात स्वयंपाकासाठी भांडी उपलब्ध होती. मात्र वापरानंतर ती परत करण्याची अट असतानाही काही लोकांनी ती चोरून नेली, त्यामुळे आता तो तलाव नाहिसा झाल्याचं दिसून येतं.
गाडगे महाराजांनी अनिष्ट प्रथा बंद केली
शंकराचा अंश याठिकाणी असल्याने काळाच्या ओघात येथे सुपारीची पूजा सुरू झाली. सुरुवातीला गवळी समाजाकडून सुपारीला तुपाचा लेप लावण्याची प्रथा होती, जी नंतर परिसरातील गावांनीही स्वीकारली. याच परंपरेतून आजचा भव्य बहिरम बाबा साकार झाल्याचे सांगितले जाते. पूर्वी बहिरम बाबाला मांसाहाराचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा होती. यात्रेच्या काळात पहिल्या पायरीपासून शेवटपर्यंत बकऱ्यांचे बळी दिले जात, आणि त्याच ठिकाणच्या पाणी आणि मातीच्या हंडीत मटण शिजवले जात असे. मात्र, संत गाडगे महाराजांनी ही प्रथा बंद करून यात्रास्थळी स्वच्छता आणि शुद्धतेवर भर दिला.
बहिरमचे हंडी मटण प्रसिद्ध
आज बहिरम बाबाला नैवेद्य दिला जात नसला, तरीही मातीच्या हंडीत शिजवलेल्या मटणाची चव अनुभवण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. येथील माती आणि पाण्यामुळे मिळणारी वेगळी चव ही या यात्रेचं मुख्य आकर्षण ठरली आहे. अनेक वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू असून, श्रद्धा, इतिहास आणि खाद्यसंस्कृती यांचा हा अनोखा संगम असल्याची भावना नागरिक व्यक्त करतात.





