प्राथमिक माहितीनुसार, धाड येथील जमदार कुटुंबातील सदस्यांना परवापासून अचानक त्रास जाणवू लागला होता. सर्वांना पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला गेला. सुरुवातीला हा त्रास सामान्य वाटला असला तरी, हळूहळू मुलांची प्रकृती खालावत गेली आणि यातच तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. मोहंमद अली जमदार (वय ३ वर्षे), मोहंमद वसीम जमदार (वय ४ वर्षे), मशीरा मोहंमद जमदार (वय ७ वर्षे) असे मृत्यूमुखी पावलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
advertisement
एकाच घरातील तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा
या विषबाधेचा त्रास कुटुंबातील इतर सदस्यांनाही जाणवतो आहे. मृत मुलांची आई आणि इतर दोन मुलींची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एकाच घरातील तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने धाड गावात हळहळ व्यक्त होत आहे. जमदार कुटुंबावर ओढवलेल्या दु:खामुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
आरोग्य विभागाकडून आणि पोलिसांकडून चौकशी सुरू
स्थानिक आरोग्य विभागाने घटनेची माहिती घेऊन चौकशी सुरू केली आहे. तसेच पोलिसांनी देखील घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला आहे. अन्नातून विषबाधा नक्की कशामुळे झाली? त्यांनी शेवटचे जेवण काय केले होते? याबाबतचा तपास आता प्रशासन करीत आहे.
