नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव गजानन जाधव हा युवक गावातीलच एका लग्न समारंभासाठी उपस्थित होता. लग्नविधी पार पडल्यानंतर पंगतीत जेवणावळी सुरू होत्या. यावेळी गावातीलच नितीन सपकाळ याच्यासोबत गौरवचा वाद झाला. हा वाद काही क्षणात इतका विकोपाला गेला की, नितीनने त्याच्यासोबत असलेल्या मयुरेश दसरकर याच्याकडील चाकू हिसकावून घेतला आणि गौरववर सपासप वार केले.
advertisement
कावड यात्रेतील वादाची किनार
या हल्ल्यामागे जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या कावड यात्रेदरम्यान गौरव आणि नितीन यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. तोच राग मनात धरून नितीनने लग्नकार्यासारख्या ठिकाणी हा हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गौरव जाधव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मध्यस्थी करणाऱ्यावरही वार
भांडण सोडवण्यासाठी आणि गौरवला वाचवण्यासाठी अरुण सुभाष जाधव हे मध्यस्थी करायला पुढे सरसावले. मात्र, संतापलेल्या आरोपीने त्यांच्यावरही वार केल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून लग्नाच्या आनंदी वातावरणाला गालबोट लागले आहे.
घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
