अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्र्यांच्या नावाबाबत धक्कातंत्राचा वापर केल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांना मंत्र्यांच्या यादीतून वगळण्यात आले. या दोन्ही नेत्यापैकी दिलीप वळसे पाटील यांना वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव मंत्री पद मिळणार नसल्याचे म्हटले जात होते. मात्र, भुजबळ यांचा समावेश निश्चित मानला जात होता. भुजबळांना मंत्रिपदी संधी न मिळाल्याने भुजबळ समर्थक नाराज होते. आता छगन भुजबळांदेखील आपली प्रतिक्रिया व्यक्त करत मी नाराज असल्याचे म्हटले.
advertisement
जरांगेंना अंगावर घेतल्याचे बक्षीस मिळाले...
छगन भुजबळ यांना विधीमंडळ सभागृह आवारात पत्रकारांनी मंत्रिपद न मिळाल्याबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की, नव्यांना संधी देण्यासाठी मला डावलण्यात आले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाच्या मुद्यावर अंगावर घेतल्याचे बक्षीस मला मिळाले असल्याची ख खंत छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. मी सामान्य कार्यकर्ता आहे..त्यामुळे मला डावललं काय, फेकलं काय, काय फरक पडतो असंही भुजबळ यांनी म्हटले. मंत्रिपद किती आले आणि गेले पण छगन भुजबळ काही संपणार नाही असेही त्यांनी म्हटले.
भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने ओबीसी संघटना नाराज...
महायुतीला विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाचे मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. छगन भुजबळ हे ओबीसी समाजातील मोठे नेते आहे. भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, भुजबळांना वगळण्यात आल्याने ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त केली. भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याची मागणी विविध संघटनांनी केली. नाशिकमध्येही भुजबळ समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भुजबळ फार्मवर भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांनी बैठक घेतली. तर, काहींनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली.