जमिनीच्या व्यवहारात 'डमी' मालकाचा खेळ
डमी जमीनमालक उभा करून तब्बल 13 एकर मोक्याच्या जमिनीचा 70 लाख रुपयांचा बनावट सौदा करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिरुपती येथील एमएस्सी शिक्षित महिलेसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नेमका कट कसा रचला?
जालना रोडवरील करमाड शिवारात हैदराबाद येथील मोठे कंत्राटदार सायन्ना रायचुरी यांची 13 एकर मोक्याची जमीन आहे. ही जमीन हडप करण्याच्या उद्देशाने मुख्य सूत्रधार राजू जाधव आणि त्याची पत्नी वैशाली जाधव यांनी सखोल कट रचला. मूळ जमीनमालक पुरुष असतानाही त्यांनी तिरुपती येथील व्ही. लता या उच्चशिक्षित महिलेला 13 लाख रुपयांचे आमिष दाखवून छत्रपती संभाजीनगर येथे आणले.
advertisement
त्यानंतर व्ही. लता हिच्या नावाने नव्हे तर तिला सायन्ना रायचुरी या नावाचे बनावट आधार कार्ड तयार करून डमी जमीनमालक म्हणून उभे करण्यात आले. या बनावट ओळखीच्या आधारे 13 एकर जमिनीचा तब्बल 70 लाख रुपयांचा खोटा व्यवहार केल्याचे तपासात उघड झाले आहे.
या फसवणूक व्यवहारात वापरण्यात आलेले बनावट धनादेश वटवण्यासाठी बंगळुरू येथील गजलक्ष्मी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने मदत केल्याचेही तपासात समोर आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात राजू जाधव, वैशाली जाधव आणि व्ही. लता यांना अटक केली असून व्ही. लताचा पती सुरेश याचा शोध सध्या सुरू आहे.
जमीन खरेदी करताना हे नक्की तपासा
जमीन व्यवहार करताना केवळ कागदपत्रांवर विश्वास ठेवू नये, असा इशाराही या प्रकरणातून समोर आला आहे.
– आधार कार्ड फक्त पाहून समाधान मानू नका, त्याची बायोमेट्रिक आणि ऑनलाइन पडताळणी करा.
– जमिनीचा किमान गेल्या 30 वर्षांचा टायटल सर्च रिपोर्ट तपासा.
– प्रत्यक्ष जागेवर जाऊन मूळ जमीनमालकाची ओळख पटवा आणि स्थानिक चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे.
