तामिळनाडू शासनाकडून प्राप्त माहितीनुसार, २६ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३ विद्यार्थी पाण्यात उतरले होते. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील मयुरी चौधरी यांना दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला, तर जय पाटील यांचा शोध अद्याप लागलेला नाही आणि त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. राज केदारी हे सुरक्षितपणे बाहेर आले आहेत.
जय पाटील यांचे नातेवाईक चेन्नई येथे पोहोचले असून मयुरी चौधरी यांचे नातेवाईक नागपूरहून चेन्नईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुःखद घटनेबद्दल मयुरी चौधरी यांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त करत संवेदना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
तामिळनाडू सरकारने शोध आणि बचाव कार्य अधिक गतीने राबवावे, मुख्यमंत्री फडणवीस यांचा फोन
तसेच, तामिळनाडू सरकारने शोध आणि बचाव कार्य अधिक गतीने राबवून सर्वतोपरी मदत करावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य प्रशासन संबंधित कुटुंबीयांच्या सतत संपर्कात असून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जात आहे.
१५ दिवसांपूर्वीच मयुरीला नोकरी लागली होती
मूळ भंडारा जिल्ह्यातील वरठी गावची रहिवासी असलेली मयुरी चौधरी (वय अंदाजे २२) हिचा या अपघातात बुडून मृत्यू झाला. पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर ग्रुप सेल्फी घेत असताना अचानक मोठी लाट उसळल्यामुळे २६ जणांपैकी तीन मुलं समुद्रात वाहून गेली. आपल्या लेकीच्या सुरक्षित भवितव्यासाठी स्वप्ने पाहणाऱ्या मयुरीच्या आई-वडिलांवर आघात झालाय.
