FASTag बाबत मोठा निर्णय, डिजिटल पेंमेंटच्या नियमांत बदल, नवे नियम कधीपासून लागू?
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
FASTag New Rule: देशभरातील सुमारे 1150 हून अधिक टोलनाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, यामुळे टोल व्यवस्थापन पारदर्शक व सुलभ होईल.
पुणे : देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर 1 एप्रिलपासून रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) मार्फत केली जाणार असून टोल वसुली प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल माध्यमातून केली जाणार आहे. टोल संकलनात पारदर्शकता वाढवणे, वाहतुकीचा वेग कायम राखणे आणि प्रवाशांचा वेळ वाचवणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर आता केवळ डिजिटल पेमेंटच स्वीकारले जाईल. वाहनधारकांना टोल भरण्यासाठी फास्टॅग किंवा यूपीआय या पर्यायांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत फास्टॅगचा वापर 98 टक्क्यांहून अधिक वाढला असून सध्या बहुतांश वाहनांवर फास्टॅग बसविण्यात आले आहेत.
advertisement
टोलनाक्यांवर रोख व्यवहार करताना सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद, व्यवहारासाठी लागणारा अतिरिक्त वेळ आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही समस्या कायमची दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. डिजिटल व्यवहारामुळे वाहनांचा वेग कायम राहील, इंधनाची बचत होईल आणि प्रदूषणातही घट होण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे. विशेषतः सणासुदीच्या किंवा सुट्ट्यांच्या काळात टोलनाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आता कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
advertisement
सध्याच्या नियमांनुसार वैध फास्टॅगशिवाय टोल लेनमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांना दुप्पट टोल आकारला जातो. तसेच यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्या वाहनधारकांना लागू दराच्या 1.25 पट रक्कम भरावी लागते. 1 एप्रिलनंतर रोख व्यवहार पूर्णतः बंद होणार असल्याने वाहनधारकांनी वेळेत फास्टॅग रिचार्ज करून ठेवणे किंवा यूपीआयची सुविधा वापरणे आवश्यक ठरणार आहे.
देशभरातील सुमारे 1150 हून अधिक टोलनाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, यामुळे टोल व्यवस्थापन अधिक सुसूत्र, पारदर्शक आणि कार्यक्षम होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 10:35 AM IST










