Mumbai Local: मुंबईकर रविवारी खोळंबा होणार, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, पाहा कधी आणि कुठं? सविस्तर
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून वीकेंडला तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करावं लागेल.
मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून वीकेंडला रेल्वेचं नियोजन पाहूनच घराबाहेर पडावं लागेल. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर अपडेट जाणून घेऊ.
मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड ते ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत ब्लॉक राहील. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी 10.04 ते दुपारी 3.09 दरम्यान सुटणाऱ्या धीम्या लोकल गाड्या मुलुंड आणि ठाणे दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे स्थानकावर त्या पुन्हा धीम्या मार्गावर आणल्या जातील. तसेच कल्याणहून सकाळी 10.36 ते दुपारी 3.24 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या लोकल गाड्यांनाही ठाणे–मुलुंड दरम्यान जलद मार्गावरून चालवण्यात येईल.
advertisement
हार्बर मार्गावर खोळंबा
हार्बर मार्गावरही प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पनवेल ते वाशी (पोर्ट मार्ग वगळता) दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या वेळेत ब्लॉक राहील. या काळात पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सेवा सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 पर्यंत रद्द राहतील. सीएसएमटीहून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलही सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत रद्द करण्यात येणार आहेत.
advertisement
ट्रान्स हार्बरवर सेवा बंद
ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे दरम्यान सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 या वेळेत सेवा बंद राहील तर ठाणेहून पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 पर्यंत रद्द असतील. मात्र ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. तसेच ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर सेवा सुरू राहील.
advertisement
पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक
दरम्यान, पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते विरार दरम्यान शनिवारी रात्री 2.10 ते पहाटे 4.10 या वेळेत धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळेत सर्व धीम्या लोकल गाड्या जलद मार्गावरून चालवण्यात येतील. बोरिवली ते दहिसर दरम्यान पादचारी पुलाच्या उभारणीचे काम करण्यात येणार असून काही लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावतील तर काही लोकल सेवा रद्द राहण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासून नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 7:56 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मुंबईकर रविवारी खोळंबा होणार, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, पाहा कधी आणि कुठं? सविस्तर










