स्कॉर्पिओ-ट्रॅव्हल्सची धडक, ६ जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ वाहन (क्रमांक MH 46 P 5392) रामपूर येथून लग्न सोहळा आटोपून भाडभीडी मोकासाकडे जात होते. या वाहनात एकूण १६ प्रवासी प्रवास करत होते. गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील तळोधी (मोकासा) गावाजवळ असलेल्या एका धोकादायक वळणावर, समोरून येणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हल्सने (क्रमांक MH 15 CK 5005) स्कॉर्पिओला भीषण धडक दिली.
advertisement
स्कॉर्पिओचा अक्षरशः चक्काचूर, लग्नाच्या आनंदाचे रूपांतर काही क्षणातच आक्रोशात
ही धडक इतकी जबरदस्त होती की, स्कॉर्पिओ वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले. लग्नाच्या आनंदाचे रूपांतर काही क्षणांतच आक्रोशात झाले.
उपचारासाठी नेत असताना वाटेत दोघांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
अपघातात गंभीर जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारासाठी नेत असताना दोघांचा प्राण वाटेतच गेला. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
