मुंबईहून आलेली महिला; खरेदीसाठी तुळशीबागेत गेली अन् आला भयंकर अनुभव, लगेचच पोलिसात धाव
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मुंबईहून पुण्यात खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून चोरट्याने चक्क दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
पुणे: कपडे, दागिने आणि घरगुती वस्तूंच्या खरेदीसाठी महिलांची पहिली पसंती म्हणजे तुळशीबाग. इथे जवळपास दररोजच खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, याच पुण्याच्या तुळशीबागेत पुन्हा एकदा चोरीची मोठी घटना घडली आहे. मुंबईहून पुण्यात खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून चोरट्याने चक्क दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्याचा माग काढत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळच्या मुंबईतील कफ परेड परिसरातील रहिवासी आहेत. २१ मार्च रोजी सायंकाळी त्या खरेदीसाठी तुळशीबाग परिसरात आल्या होत्या. गुढीपाडवा आणि लग्नसराईच्या निमित्ताने बाजारपेठेत मोठी गर्दी होती. यावेळी संबंधित महिलेने आपले सोन्याचे दागिने सुरक्षित राहतील या हेतूने ते अंगावर न घालता पर्समध्ये ठेवले होते. मात्र, गर्दीचा फायदा घेत अट्टल चोरट्याने हातचलाखीने त्यांच्या पर्सची चैन उघडून दीड लाखांचे दागिने लंपास केले.
advertisement
खरेदी करताना अचानक आपली पर्स रिकामी असल्याचे लक्षात येताच महिलेला मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्यपूर्वक दखल घेतली असून, गर्दीच्या ठिकाणी वावरणाऱ्या 'पाकीटमारांच्या' टोळीचा शोध सुरू केला आहे.
तुळशीबाग आणि लक्ष्मी रोड सारख्या गजबजलेल्या ठिकाणी खरेदीला जाताना महिलांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आणि दागिने पर्समध्ये ठेवण्यापेक्षा ते सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 10:51 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
मुंबईहून आलेली महिला; खरेदीसाठी तुळशीबागेत गेली अन् आला भयंकर अनुभव, लगेचच पोलिसात धाव







