टोळीयुद्धात 'या' तिघांचा खेळ खल्लास
गँगवॉरमधून झालेल्या हल्ल्यात अर्जित सिंग चव्हाण, मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेझ अशा तिघांची हत्या झाली आहे. मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेझ यांच्या टोळीने अर्जित सिंग चव्हाणच्या हत्येचा कट रचला होता. त्यांनी शुक्रवारी मध्यरात्री अर्जितसिंगवर हल्ला केला. मात्र यात अर्जित सिंगसह हत्येचा प्लॅन करणारे अरबाज आणि आवेझ याचाही खून झाला आहे.
advertisement
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मयत अर्जित सिंग हा 'सदा गँग' नावाच्या गुन्हेगारी टोळीचा प्रमुख होता. तर मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेझ हे शहरातीलच दुसऱ्या 'साई लाला' गँगचे शूटर होते.
नेमका घटनाक्रम काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सदा गँग आणि साई लाला गँग यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून वर्चस्ववादातून धुसफूस सुरू होती. शुक्रवारी रात्री अर्जित सिंग चव्हाण हा आपल्या मित्रासह बुलेटवरून डी-मार्ट जवळून जात होता. यावेळी दबा धरून बसलेल्या अरबाज आणि त्याच्या साथीदारांनी अर्जितवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात अर्जितचा जागीच मृत्यू झाला. अर्जितवर हल्ला होत असताना त्याच्या सोबत असलेल्या साथीदारांनी प्रतिहल्ला केला. त्यांनी मोहम्मद अरबाजवर चाकू आणि खंजीरने सपासप वार केले, ज्यामध्ये अरबाजचा देखील मृत्यू झाला.
८ जण ताब्यात
या दोन हत्यांनंतरही हा राडा थांबला नाही. अर्जितच्या भावाने थेट रुग्णालय गाठले आणि तिथे उपचार घेत असलेल्या साई लाला गँगच्या सय्यद आवेझवर हल्ला करून त्याचा खून केला. एकाच रात्रीत झालेल्या या तिहेरी हत्याकांडामुळे पोलीस यंत्रणा हादरली आहे. भाग्यनगर पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करत आतापर्यंत ७ ते ८ जणांना ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली.
या राड्यामध्ये दोन्ही बाजूचे पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन्ही गँगमध्ये वादाचे मूळ कारण काय होते आणि यामागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत. मात्र, भरवस्तीत झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
