भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त सांगलीत कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणातून विरोधी पक्षाला जोरदार लक्ष्य केले. २०२९ साली सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भाजपचाच खासदार पाहिजे, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले.
जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका
आपण इतके वर्षे मंत्री होता. ईश्वरपूर-सांगली हा एक रस्ता तुम्हाला करता आला नाही. तुमच्या जिंदगीवर थुंकतो, तो रस्ता माझ्या पक्षाच्या काळात झाला, असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली. जयंत पाटील यांची सत्ता असलेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक लागू झालेय. तुमची लुटीची सर्व साधने आम्ही बंद पाडू, कोणालाही खायला देणार नाही, असा इशाराही त्यांनी जयंत पाटील यांना दिला.
advertisement
जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आली नाही याचे दुःख नाही, आपले मुख्यमंत्री-पालकमंत्री आहेत
सांगलीजिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता आली नाही याचे दुःख नाही. पालकमंत्री, मुख्यमंत्री भाजपचे आहेत, पदाधिकाऱ्यांनी निश्चिंत राहावे, असेही पडळकर म्हणाले. 2029 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे खासदार असले पाहिजेत, त्यासाठी आपण तयारीला लागूया, असे पडळकर म्हणाले.
दोन खासदारांपासून प्रवास, आज जगातील सगळ्यात मोठा पक्ष
जनसंघाच्या काळापासून सुरू झालेला हा प्रवास हा केवळ राजकारणाचा नाही, तर विचार, तत्त्वनिष्ठा आणि अथक परिश्रमांचा आहे. दोन खासदारांपासून सुरुवात करून आज माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उभा आहे, ही प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अभिमानाची बाब आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि भारताला जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्यासाठी पक्ष अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः SIR, डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर तळागाळात प्रभावी काम करण्याचे आवाहन यावेळी पडळकर यांनी केले.
