प्रवाशांचं काय झालं?
सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कारमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने क्षणाचाही विलंब न लावता प्रसंगावधान राखले. त्याने तातडीने कार रस्त्याच्या कडेला उभी केली आणि आतील सर्व प्रवाशांना बाहेर उतरवले. प्रवाशांनी कार सोडल्यानंतर अवघ्या काही सेकंदांतच आगीने संपूर्ण कारला विळखा घातला. चालकाच्या या समयसूचकतेमुळे मोठा रक्तपात टळला आणि सर्वांचे प्राण वाचले.
advertisement
अग्निशमन दलाची धाव
घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत कारचा केवळ सांगाडा उरला होता. भरचौकात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
महामार्गावर भीतीचे वातावरण
ऐन गर्दीच्या वेळी राष्ट्रीय महामार्गावर कार जळत असताना दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळाली नाही. पोलिसांनी वाहतूक पूर्ववत केली आहे. डोळ्यादेखत ओमनी जळून खाक झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं.
