फेरफार रद्द करण्याची प्रक्रिया
फेरफार रद्द करण्यासाठी सर्वप्रथम संबंधित नोंदींची अचूक माहिती घेणे आवश्यक आहे.त्यासाठी तलाठी कार्यालयातून मंजूर फेरफार उताऱ्याची प्रमाणित प्रत मिळवावी लागते. यामुळे नेमकी कोणती नोंद चुकीची आहे, हे स्पष्ट होते.
यानंतर अर्जदाराने एक सविस्तर अर्ज तयार करावा. या अर्जात फेरफार चुकीचा कसा झाला, त्यामागील कारणे काय आहेत आणि तो रद्द का करावा, याचे स्पष्ट स्पष्टीकरण देणे आवश्यक असते. हा अर्ज उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे अपील स्वरूपात सादर करावा लागतो.
advertisement
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये आधार कार्ड, सातबारा उतारा, फेरफार उतारा, मृत्यूदाखला (लागू असल्यास) तसेच इतर पुरावे जोडावे लागतात. ही कागदपत्रे प्रकरणाची सत्यता सिद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
सुनावणी आणि निर्णय
अर्ज दाखल झाल्यानंतर SDO कार्यालयाकडून दोन्ही पक्षांना सुनावणीसाठी बोलावले जाते. यावेळी संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाते आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकले जाते. जर फेरफार चुकीचा किंवा फसवणुकीद्वारे झाल्याचे सिद्ध झाले, तर SDO फेरफार रद्द करण्याचा किंवा त्यात आवश्यक दुरुस्ती करण्याचा आदेश देऊ शकतात.
आदेशाची अंमलबजावणी
SDO यांचा आदेश मिळाल्यानंतर तो संबंधित तलाठी कार्यालयाकडे सादर करावा लागतो. त्यानंतर तलाठी नवीन फेरफार नोंद करून जुनी चुकीची नोंद रद्द करतात. यामुळे जमिनीच्या नोंदी अधिकृतपणे सुधारित केल्या जातात.
महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा
फेरफार रद्द करण्यासाठी वेळेचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. साधारणपणे फेरफार मंजूर झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत अपील दाखल करणे आवश्यक असते. उशीर झाल्यास प्रकरण गुंतागुंतीचे होऊ शकते.
तसेच, जर एखादा नोंदणीकृत दस्त फसवणुकीद्वारे करण्यात आला असेल, तर केवळ महसूल विभागाकडे अपील करून उपयोग होत नाही. अशा परिस्थितीत फेरफार रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दाद मागावी लागते.
