म्हाडा म्हणजे काय? आणि सोडतीची प्रक्रिया कशी असते?
म्हाडा ही राज्य सरकारची अधिकृत संस्था असून अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देते. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर अशा विविध मंडळांमार्फत दरवर्षी घरांची लॉटरी काढली जाते. त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या भागांतील नागरिकांना अर्ज करण्याची संधी मिळते.
advertisement
एका सोडतीत अनेक ठिकाणी अर्ज करता येतो का?
होय, एका सोडतीत अर्जदाराला एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज करता येतो. उदाहरणार्थ, मुंबई मंडळाच्या लॉटरीत अंधेरी, गोरेगाव किंवा कांदिवली येथे घरे उपलब्ध असतील, तर पात्र अर्जदार या सर्व ठिकाणांसाठी स्वतंत्र अर्ज करू शकतो.
मात्र, प्रत्येक घरासाठी स्वतंत्र अर्ज शुल्क भरावे लागते. म्हणजेच तुम्ही तीन वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करत असाल, तर तीन वेळा शुल्क भरावे लागेल. याशिवाय उत्पन्न गट, वय, अधिवास (डोमिसाइल) आणि इतर पात्रतेच्या अटी पूर्ण करणे अनिवार्य आहे.
वेगवेगळ्या मंडळांच्या सोडतीत अर्ज करण्याची संधी
जर एकाच कालावधीत म्हाडाच्या विविध मंडळांच्या लॉटऱ्या सुरू असतील, तर अर्जदार प्रत्येक मंडळासाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतो. उदाहरणार्थ, मुंबई, पुणे किंवा कोकण मंडळाच्या लॉटरीत एकाच वेळी अर्ज करणे शक्य आहे.
प्रत्येक सोडतीसाठी स्वतंत्र नोंदणी करावी लागते आणि त्यासोबत अनामत रक्कम (EMD) जमा करावी लागते. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी, कारण चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
अंतिम निवड कशी होते?
महत्त्वाची बाब म्हणजे, एका सोडतीत अर्जदाराला केवळ एकच घर मिळू शकते. जरी अनेक ठिकाणी अर्ज केले असले तरी संगणकीय लॉटरी प्रक्रियेद्वारे फक्त एकाच घराची निवड केली जाते. एकदा घर लागल्यानंतर उर्वरित सर्व अर्ज आपोआप रद्द होतात.
अर्ज करताना घ्यायची काळजी
अर्जदारांनी खालील गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. जसे की,
योग्य उत्पन्न गटाची निवड करणे.
कागदपत्रांची अचूक माहिती देणे.
एकाच घरासाठी एकाच नावाने वारंवार अर्ज न करणे.
अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम वेळेत भरणे.
घर मिळण्याची शक्यता कशी वाढवता येईल?
अनेक ठिकाणी अर्ज करण्याची परवानगी असल्यामुळे विशेषतः मोठ्या शहरांमध्ये घर मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे उपलब्ध पर्यायांचा योग्य वापर केल्यास स्वतःचे घर मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता अधिक वाढू शकते.
