विद्या विजय राठोड असं हत्या झालेल्या ३२ वर्षीय महिलेचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेची अधिक माहिती अशी की, विद्या विजय राठोड या महिलेचा काही वर्षांपूर्वी जिंतूर तालुक्यातील वाघे येथील विजय राठोड यांच्याशी विवाह झाला. सुरुवातीला काही दिवस संसार सुरळीत चालू होता. त्यानंतर मात्र पती-पत्नीमध्ये भांडण होऊ लागली. तरीही दोघंही एकमेकांना सांभाळून संसार करू लागले.
advertisement
दरम्यान या दाम्पत्यांना दोन मुलंही झाली. मुलांच्या जन्मानंतर तरी संसार सुरळीत होईल, असे विद्याला वाटत होते. पण दोघांमधील भांडण काही कमी झालं नाही. यामुळे कंटाळून विद्याने आपल्या माहेरी सोनापूर तांडा येथे वडिलांकडे जाण्याचा निर्णय घेतला. तिला वाटले नवरा आता तरी सुधारेल. पण झालं उलटं. विजयने तिची निर्घृण हत्या केली.
घटनेच्या दिवशी गुरुवारी दुपारी विद्या आपल्या वडिलांच्या शेतामध्ये काम करत होती. दुपारी दोनच्या सुमारास विजय त्या ठिकाणी आला. दोघांमध्ये बोलणं होत असतानाच शाब्दिक चकमक उडाली आणि अचानक पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. यावेळी चिडलेल्या विजयने सोबत आणलेले धारदार शस्त्र काढले आणि पत्नी विद्या हिच्या अंगावर सपासप वार सुरु केले. यात विद्या गंभीर जखमी झाली. आरडाओरड झाल्याने आजूबाजूचे शेतकरी देखील धावतपळत आले. सर्वांनी मिळून विद्याला जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विद्याला मृत घोषित केले.
विशेष म्हणजे पत्नी विद्या भांडण करून माहेरी गेल्यानंतर विजयने रविवारी स्वतःच्या मोबाईलवर विद्या राठोड हिचा फोटो ठेवून त्याखाली 'भावपूर्ण श्रद्धांजली बायको' असा मजकूर लिहिला होता. त्यानंतर विजयने बुधवारी 'भांडण झाल्यावर लोक त्यांचा व्हॉट्सअप डीपी हटवतात, मी लोकांनाच हटवतो' असं स्टेटस ठेवलं होतं. त्यामुळे हा खून पूर्वनियोजित असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.