कँटीनमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण असो की विमानात राडा असो संजय गायकवाड हे नेहमी वादाच्या अग्रभागी असतात. आता तर संजय गायकवाड यांनी थेट कमिशन सोडल्याचं बोलून नवा वाद उकरून काढला आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना संजय गायकवाड यांनी उघडपणे कबुली दिली आहे.
काय म्हणाले संजय गायकवाड?
' जवळपास मी ३५ कोटी रुपयांचे कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं' असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. या कार्यक्रमाचा तपशील अद्याप समोर आला नाही. पण, संजय गायकवाड यांच्याकडून कमिशनखोरीची कबुलीच असल्याचं मानलं जात आहे. एकीकडे राज्यात अर्थसंकल्पीय आधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे महायुतीच्या आमदाराच धक्कादायक विधान समोर आलं आहे.
advertisement
[video width="1920" height="1080" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-23-at-17.23.54-2026-03-edd0c5bc96b735ecc767ecea643d5c6d.mp4"][/video]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडे राज्यात कमिशनखोरी चालू देणार नाही, असं विधानपरिषदेत ठामपणे सांगितलं होतं. पण, असं असताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे जाहीरपणे कबुली देत असल्यामुळे किती प्रमाणात कमिशन घेत असतील, याचा अंदाज त्यांच्या बोलण्यावरून येत आहे.
कामाच्या ऐवजी चुकून कमिशन शब्द - संजय गायकवाड
दरम्यान, या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संजय गायकवाड यांनी खुलासा केला आहे. मला तसं काही म्हणायचं नव्हतं. माझ्या डाव्याबाजूची बोबडी वळत असते, त्यामुळे ३५ कोटींची कामं सोडून दिली असं म्हणायचं होतं, त्या ऐवजी कमिशन शब्द आला, मला काम म्हणायचं होतं, पण चुकून कमिशन हा शब्द चुकून तोंडात आला, कार्यक्रम संपवल्यावर सुद्धा मी लोकांना समजावून सांगितलं, अशी सारवासारव संजय गायकवाड यांनी केली. तसंच, कार्यकर्त्यांसाठी मी काम सोडली असं म्हणायचं होतं, पण चुकून कमिशन शब्द वापरला गेला, असं पुन्हा एकदा संजय गायकवाड म्हणाले.
