इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली जीवघेणी
मूळची गोंदिया येथील असलेली अशरफी ऊर्फ सिया (३३) ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. इन्स्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स होते. यातूनच तिची ओळख भोपाळमधील समीर नावाच्या रिक्षाचालकाशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आपल्या सुखी संसाराचे स्वप्न उराशी बाळगून सिया घर सोडून भोपाळला आली. तिथे दोघांनी लग्नही केलं.
advertisement
समीरचं तिसरं लग्न आणि घरगुती वाद
तपासात समोर आले की, समीरचं हे तिसरं लग्न होतं. त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती, तर दुसरी पत्नी त्याच्यासोबतच राहत होती. सियाला घरी आणल्यानंतर समीरने सुरुवातीला ती आपली मेहुणी असल्याचं शेजाऱ्यांना सांगितलं. मात्र, नंतर त्यांच्या लग्नाचं सत्य समोर आलं. एकाच घरात दोन पत्नींना ठेवण्यावरून समीरच्या घरात सतत वाद होऊ लागला. याच वादामुळे त्याची दुसरी पत्नी काही दिवसांपूर्वीच माहेरी निघून गेली होती.
दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजी परिसरातील एका पाण्याच्या टाकीत एक संशयास्पद लोखंडी पेटी आढळली. पोलिसांनी ती पेटी उघडली असता त्यात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. मृतदेहाच्या हातावर 'दीप' नावाचा टॅटू आणि जन्म तारीख कोरलेली होती. या खुणांच्या आधारे पोलिसांनी मृतदेहाची ओळख 'सिया' म्हणून पटवली. यानंतर हे हत्याकांड उघडकीस आलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी समीर आणि सिया यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. रागाच्या भरात समीरनं सियाचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने चक्क त्याच्या दुसऱ्या लग्नात हुंड्यात मिळालेली पत्र्याची पेटी काढली. त्या पेटीत सियाचा मृतदेह कोंबला आणि ती पेटी घराशेजारील पाण्याच्या टाकीत फेकून दिली. धक्कादायक म्हणजे, खून केल्यानंतर समीर अत्यंत निर्धास्तपणे आपल्या दुसऱ्या पत्नीला आणण्यासाठी जबलपूरला गेला होता.
आरोपी पती अटकेत
मृतदेह तीन-चार दिवस जुना असल्याने तो कुजण्यास सुरुवात झाली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून संशयित पती समीरला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली जात असून या घटनेने गोंदिया आणि भोपाळ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
