३० लाखांचं कर्ज ठरलं मृत्यूचं कारण
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कल्याण भोजने (४१) याने सागर धानुरे याला आठ महिन्यांपूर्वी व्याजाने ३० लाख रुपये आणून दिले होते. मात्र, वारंवार मागणी करूनही सागर पैसे परत करत नव्हता. कर्जाचे व्याज स्वतःलाच भरावे लागत असल्याने संतप्त झालेल्या भोजने याने सागरचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी त्याने कमलेश झाडीवाले (२८) याला २५ लाख रुपयांची सुपारी दिली.
advertisement
असा रचला खुनाचा सापळा
घटनेच्या रात्री भोजने याने सागरला फोन करून अंबड बायपासला बोलावलं. सागर आपल्या कारमध्ये एकटाच असताना मारेकरी कमलेश झाडीवाले तिथे आला आणि सागरच्या शेजारी बसला. त्याला बोलण्यात गुंतवून झाडीवाल्याने जवळ असलेल्या गावठी पिस्तुलातून सागरच्या गळ्यावर दोन राउंड फायर केले. गोळी लागल्यानंतरही सागरने आरोपीला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा झाडीवाल्याने चाकूने त्याच्या छातीवर आणि गळ्यावर वार करून त्याला ठार केले.
एक फोन कॉलमुळे उलगडलं गूढ
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रं फिरवली. पोलिसांनी सागरच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स (CDR) तपासले असता, घटनेच्या काही वेळ आधी कल्याण भोजने याच्याशी त्याचं बोलणं झाल्याचं समोर आलं. संशयावरून भोजनेला ताब्यात घेतलं असता त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मारेकरी कमलेश आणि सुपारी देणारा कल्याण अशा दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
मारेकरी अंत्यविधीलाही हजर
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मारेकरी कमलेश झाडीवाले हा सागरचा मित्र होता. खून केल्यानंतर या घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्यासाठी त्याने पिस्तूल सागरच्या मांडीवर ठेवले. एवढेच नाही तर, नंतर तो मित्रांसोबत पुन्हा तिथे आला, मृतदेह रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली आणि छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शवविच्छेदनावेळी आणि अंत्यविधीलाही उपस्थित राहून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलीस दोघांची कसून चौकशी करत आहेत.
