युवा नेते जय पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकांची पाहणी केली. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, जय पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत प्रशासनाकडे मदतीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर भाष्य केले.
advertisement
विरोधकांपैकी कुणाला लढायचे असेल तर त्यांनी खुशाल लढावे
बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीचा प्रयत्न आहे. खुद्द सुनेत्रा पवार यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंब्याची विनंती केली. दुसरीकडे काँग्रेस पक्ष मात्र बारामतीत उमेदवार देण्यावर ठाम आहे. रविवारी दुपारपर्यंत उमेदवाराची घोषणा करू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. याच अनुषंगाने जय पवार यांना विचारले असता, विरोधकांपैकी कुणाला लढायचे असेल तर त्यांनी खुशाल लढावे. बारामतीकर कुणाच्या सोबत आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, असे ते म्हणाले.
अजितदादांनंतरची ही पहिलीच निवडणूक, जय पवार भावनिक
अजित पवार यांच्याशिवायची निवडणूक याची कधीही कल्पना केली नव्हती. मात्र दादा आता आपल्यात नाहीत. त्यांच्या नंतर ही पहिलीच निवडणूक आहे. बारामतीकर कुणाच्या सोबत आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. जर विरोधकांपैकी कुणाला लढायचे असेल तर त्यांनी लढावे. बारामतीकरांचा काय निर्णय आहे, हे सर्वांना ज्ञात आहे, असे जय पवार म्हणाले.
