या प्रकारावरून एखाद्या विवाहित महिलेवर करणी किंवा जादूटोणा केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. स्मशानभूमी सारख्या ठिकाणी अशा पद्धतीने साहित्य ठेवण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी सकाळच्या सुमारास स्मशानभूमीत जात असताना हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने याबाबत माहिती देण्यात आली.
करणीचे साहित्य जाळले
घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी करून हा प्रकार अंधश्रद्धा व जादूटोण्याशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी करणीसाठी ठेवलेले सर्व साहित्य गोळा करून ते जाळून टाकले. यावेळी गावकऱ्यांनाही अंधश्रद्धा, करणी-भानामती याबाबत जनजागृती करण्यात आली.
advertisement
समाजात भीती पसरवण्याचा प्रयत्न
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, अशा प्रकारांमुळे समाजात भीती पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. करणी-भानामतीला कोणताही शास्त्रीय आधार नसून नागरिकांनी अशा प्रकारांना बळी पडू नये, तसेच अशा घटना निदर्शनास आल्यास तातडीने प्रशासन किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
सांगली जिल्ह्यात चर्चेला उधाण
या घटनेमुळे कामेरी गावासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात चर्चेला उधाण आले असून, अशा अंधश्रद्धांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई आणि अधिक प्रभावी जनजागृतीची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
