खरंतर कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसने विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचं तिकीट कापून राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली. पण उमेदवारी मिळाल्यानंतरही राजेश लाटकर यांचं तिकीट कापण्यात आलं. काँग्रेस हायकमांडने राजेश लाटकर यांच्याऐवजी मधुरिमाराजे यांना उमेदवारी जाहीर केली. लाटकरांचं तिकीट कापून मधुरिमाराजेंना उमेदवारी देण्यामागे सतेज पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, पण मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे सतेज पाटलांवर नामुष्की ओढावली.
advertisement
20 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?
याआधी 20 वर्षांपूर्वी सतेज पाटील यांच्यामुळे मधुरिमाराजे यांचे वडील दिवंगत माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढावली होती. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढणाऱ्या सतेज पाटील यांनी दिग्विजय खानविलकर यांचा पराभव केला होता. करवीर विधानसभा निवडणुकीत दिग्विजय खानविलकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर तर सतेज पाटील अपक्ष रिंगणात होते. या निवडणुकीत सतेज पाटलांना 1,16,909 मतं मिळाली होती तर दिग्विजय खानविलकर यांना 74,305 मतांवर समाधान मानावं लागलं. करवीरच्या या निवडणुकीत सतेज पाटलांनी दिग्विजय खानविलकरांचा 42,604 मतांनी पराभव केला.
दिग्विजय खानविलकर हे सलग 25 वर्ष करवीरचे आमदार होते. याशिवाय दिग्विजय खानविलकर यांच्याकडे पाच वर्ष राज्यमंत्रीपद आणि साडेचार वर्ष आरोग्य मंत्रीपद होतं. 2004 साली पराभव झाल्यानंतर दिग्विजय खानविलकर यांनी 2009 साली कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढली, पण या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.
