विश्वजीत उर्फ पिलो राजेंद्र पतंगे (वय २५) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर राजेंद्र भानुदास पतंगे असं आरोपी बापाचं नाव आहे. टेंभुर्णी पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतलं आहे.
नेमकी घटना काय?
मसोबा देवस्थान असलेल्या रुई गावातील पतंगे कुटुंब अल्पभूधारक शेतकरी आहे. शुक्रवारी (दि. २७) दुपारी विश्वजीत आणि त्याचे वडील राजेंद्र यांच्यात शेताला पाणी देण्यावरून फोनवर जोरदार बाचाबाची झाली होती. यावेळी विश्वजीतने वडिलांना शिवीगाळ केल्याचं बोललं जात आहे. यापूर्वीही मुलाने आपल्याला मारहाण केली होती आणि आता पुन्हा त्याने शिव्या दिल्या, या रागाने पित्याचं मन कलुषित झालं होतं.
advertisement
शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास विश्वजीत घरात गाढ झोपेत होता. याच संधीचा फायदा घेत राजेंद्र पतंगे यांनी म्हैस बांधण्यासाठी वापरला जाणारा लोखंडी गज घेतला आणि झोपेत असलेल्या विश्वजीतच्या तोंडावर आणि डोक्यावर जोरदार प्रहार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, विश्वजीतचा जागीच मृत्यू झाला.
आईनेच दिली पतीविरुद्ध फिर्याद
आपल्या डोळ्यादेखत पतीकडून मुलाचा झालेला अंत पाहून आई राजश्री पतंगे यांना मोठा धक्का बसला. त्यांनी धीर एकवटून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पती राजेंद्र पतंगे याच्याविरुद्ध खुनाची फिर्याद दिली. पोटच्या मुलाचा जीव घेणाऱ्या पित्याविरुद्ध आईने दिलेल्या या फिर्यादीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांची तत्पर कारवाई
घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संशयित आरोपी राजेंद्र भानुदास पतंगे याला पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. "पूर्वी मारहाण केल्याचा राग आणि ताज्या वादातून झालेली शिवीगाळ यामुळे हा खून केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली. किरकोळ वादातून एका पित्यानं इतकं टोकाचं पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
