तक्रार मागे घेण्यासाठी 'फिल्मी' थरार
मिळालेल्या माहितीनुसार, पुसद येथील एका संस्थेच्या आर्थिक व्यवहार किंवा गैरप्रकाराबाबत प्रमोद भरवाडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली होती. हीच तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. मात्र, त्यांनी दाद न दिल्याने अज्ञात आरोपींनी अपहरणाचा कट रचला. अपहरणकर्त्यांनी भरवाडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचंही बंदूकीच्या धाकाने अपहरण केलं.
advertisement
नांदेडच्या हद्दीत नेऊन घेतल्या स्वाक्षरी
हल्लेखोरांनी भरवाडे आणि त्यांच्या कुटुंबाला गाडीत बसवून थेट नांदेड जिल्ह्यातील हदगावच्या हद्दीत नेले. तिथे डोक्यावर पिस्तूल लावून, तक्रार मागे घेण्यासंदर्भात किंवा अन्य काही कोऱ्या कागदपत्रांवर जबरदस्तीने स्वाक्षरी घेतल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे भरवाडे कुटुंब प्रचंड दहशतीखाली आहे.
निर्जनस्थळी सोडून आरोपी फरार
आपला हेतू साध्य झाल्यानंतर अपहरणकर्त्यांनी भरवाडे कुटुंबाला हिंगोली-वाशीम रोडवरील एका निर्जनस्थळी सोडून दिले आणि तिथून पळ काढला. सुदैवाने कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत, परंतु या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. इतकी मोठी घटना घडूनही अद्याप याप्रकरणी अधिकृतपणे पोलीस तक्रार दाखल झालेली नाही. भरवाडे कुटुंब अद्याप या धक्क्यातून सावरलेले नसल्याने किंवा दहशतीमुळे त्यांनी तक्रार दिली नसल्याची चर्चा आहे.
