महानगर पालिका निवडणुकीत युतीची घोषणा केल्याने भाजप समर्थक नाराज झाले आहेत. नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाला सोबत घेतल्याने जागावाटपात काही जागा शिंदेंना द्याव्या लागतील, त्यामुळे भाजपमधून इच्छुक असणाऱ्यांचा पत्ता कट होईल, यामुळे त्यांनी युतीचा विरोध केला आहे.
ठाणे शहर, ओवळा, माजीवाड्यात भाजपचा मोठा प्रभाव आहे. मागील दहा वर्षात इथं भाजपनं मोठ्या प्रमाणात पक्षाची ताकद वाढवली आहे. पण महायुती झाल्याने पक्षाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता भाजप समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कल्याण डोंबिवलीतही भाजपमध्ये नाराजी आहे. दोन्ही पक्षातील इच्छुकांची गर्दी पाहता जागा वाटप शेवटपर्यंत लांबण्याची शक्यता आहे, यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. यात विशेषत: गणेश नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष आहे.
advertisement
"...म्हणून महायुतीत लढण्याचा निर्णय"- फडणवीस
याबाबत प्रतिक्रिया देताना गणेश नाईक म्हणाले की, "अशाप्रकारे युती करावी किंवा महायुती करावी, याबाबत कोणतीही चर्चा आमच्या स्तरावर झाली नाही." भाजपातील या नाराजीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. "तिथे फार नाराजी असेल असं मला वाटत नाही. जास्त संधी मिळाली पाहिजे, असं कार्यकर्त्यांना वाटतं. पण मुंबई महानगर पालिकेवर महायुतीचा झेंडा लावणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मुंबई महापालिकेवर विकासाभिमुख आणि पारदर्शी सरकार आणणं, त्यासाठीच आम्ही महायुतीत लढण्याचा निर्णय घेतला आहे."
