या सगळ्या घडामोडीनंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी ओपन चॅलेंज दिलं आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष स्वबळावरच निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. थोडे दिवस वाट पाहा, माझ्या निर्णयासोबत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी सहमत होईल. महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी महायुती होताना आपल्याला दिसेल, बहुतांश ठिकाणी महायुतीतील तिन्ही पक्ष आपल्याला स्वबळावरच निवडणूक लढताना दिसतील, असंही किशोर पाटील यांनी म्हटलं.
advertisement
किशोर पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून महायुतीच्या तिन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात रस्सीखेच बघायला मिळाला होता. आता याच पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील जागावाटपावरून महायुतीत फूट पडण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय. अशात किशोर पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे यावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.
विशेष म्हणजे किशोर पाटील यांनी आधीच आपल्या पाचोरा भडगाव मतदार संघात स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली आहे. पाटील यांच्या भूमिकेनंतर भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनीही तातडीची बैठक घेऊन भडगाव पाचोरामध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. यामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे. त्यातच आता किशोर पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.