महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी 'माझी वसुंधरा अभियान सन्मान समारंभ'चे अध्यक्षस्थान भूषवले. पर्यावरण संरक्षणात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यभरातील निवडक स्थानिक स्वायत्त संस्थांना त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले गेले. वसुंधरा अभियानात पंढरपूर नगरपालिकेला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
शासकीय कार्यक्रमात राजशिष्टाचाराचा भंग
शासकीय कार्यक्रमात राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) धाब्यावर बसवत ठेकेदार मंचावर राहिला. शासनाचा पुरस्कार घेताना राज्यपालांच्या मंचावर ठेकेदाराने उपस्थित राहणे हे राजशिष्टाचाराचा भंग आहे. परंतु असे असूनही लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांसमेवत ठेकेदाराने उपस्थिती लावल्याने टीका होत आहे. राज्य शासनाच्या मुंबई येथील पुरस्कार सोहळ्यात मंचावर सत्यवान दहिवडकर नामे ठेकेदाराने उपस्थिती लावली. आम्ही त्यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
advertisement
ठेकेदाराला कोणाचा आशीर्वाद?
पुरस्कार स्वीकारताना राज्यपालांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात पालिकेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष तसेच आजी-माजी मुख्याधिकारी यांच्यासमवेत संबंधित ठेकेदार सत्यवान दहिवडकर मंचावर दिसून आला. शासनाच्या अधिकृत कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार केवळ मान्यवर, संबंधित अधिकारी व निवडक प्रतिनिधींनाच मंचावर स्थान दिले जाते. अशा परिस्थितीत ठेकेदाराची उपस्थिती कशी आणि कोणाच्या परवानगीने झाली, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
राज्यपालांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियानाच्या यशोगाथांवर आधारित कॉफी टेबल बुक आणि द क्लायमेट चेंज लेक्सिकॉन या मराठी-इंग्रजी पर्यावरणीय शब्दकोशाचे प्रकाशन करण्यात आले.
