Success Story : शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
प्रयोगशील शेतकरी कांतीलाल राऊत यांनी अवघ्या अर्ध्या एकर क्षेत्रात शेवग्यासह पालेभाज्यांचे मल्टिलेयर नियोजन करून लाखो रुपयांच्या उत्पन्नाचा मार्ग मोकळा केला आहे.
सोलापूर : पारंपरिक शेतीला फाटा देत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्याने आधुनिकतेची कास धरली आहे. तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी कांतीलाल राऊत यांनी अवघ्या अर्ध्या एकर क्षेत्रात शेवग्यासह पालेभाज्यांचे मल्टिलेयर नियोजन करून लाखो रुपयांच्या उत्पन्नाचा मार्ग मोकळा केला आहे. त्यांच्या या प्रयोगाची सध्या पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.
कांतीलाल यांनी गेल्या मे महिन्यात आपल्या अर्ध्या एकर शेतात 15 बाय 7 अंतरावर शेवग्याची लागवड केली होती. केवळ मुख्य पिकावर विसंबून न राहता, त्यांनी जमिनीचा आणि पाण्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी शेवग्याच्या दोन ओळींमधील रिकाम्या जागेत उन्हाळी कांदा, पालक, चुका आणि कोथिंबीर यांसारखी आंतरपिके घेण्याचे धाडस केले.
advertisement
सध्या शेवग्याच्या शेंगांची विक्री जोमात सुरू आहे. सुरुवातीला एका शेंगाला 15 ते 18 रुपयांपर्यंत विक्रमी भाव मिळाला होता. मात्र, फेब्रुवारीत आवक वाढल्याने दरात काहीशी घट झाली असली, तरी राऊत यांनी स्वतः विक्री करण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे, व्यापाऱ्यांनी थेट बांधावर येऊन शेंगा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
या संपूर्ण प्रयोगासाठी कांतीलाल यांना केवळ 25 हजार रुपये खर्च आला. आंतरपिकांच्या विक्रीतून खर्च वजा जाता आतापर्यंत 90 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. येत्या काळात शेवग्याच्या शेंगांतून सुमारे 1 लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. कमी जागेत पिकांचे योग्य नियोजन केल्यास शेती नक्कीच फायदेशीर ठरते. योग्य अंतर आणि बाजारपेठेचा अभ्यास असेल तर अर्ध्या एकरातूनही 2 लाखांपर्यंत उत्पन्न घेता येते, असा विश्वास कांतीलाल राऊत यांनी व्यक्त केला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 10:16 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न





