मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथील पश्चिमेकडील एम. जी. रोडवरील तलाठी, मंडल अधिकाऱ्याचे कार्यालय फोडून चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला होता. दरम्यान, विष्णूनगर पोलिसांनी याप्रकरणी मंत्रालयातील वित्त विभागातील कंत्राटी कर्मचारी विक्रम प्रधान (२२, रा. नेरूळ) याला अटक केली आहे. मला देशासाठी लढणारे फायटर तयार करण्यासाठी क्लब काढायचा होता. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एका गुप्त जागेचा शोध घेत होतो. फारसा वावर नसलेले तलाठी कार्यालय त्यासाठीच फोडले, अशी धक्कादायक माहिती विक्रम याने पोलिसांना दिली असून त्याची रवानगी सध्या आधारवाडी कारागृहातील न्यायालयीन कोठडीत केली आहे.
advertisement
तलाठी कार्यालयाचे कुलूप तोडणारी व्यक्ती नवीन कुलूप लावून निघून गेली होती. त्यामुळे पोलिसांनी चावी बनवून देणाऱ्यांचा शोध सुरू केला होता. यात चावीवाल्याला ताब्यात घेतल्यावर विक्रम प्रधान नावाच्या तरुणाने मंत्रालयातील ओळखपत्र दाखवून त्याच्याकडून तलाठी कार्यालयाचे कुलूप तोडून घेतल्याची माहिती समोर आली. विक्रमने त्याला ३८० रुपये ऑनलाइनद्वारे दिले होते. त्या तपशिलाच्या आधारे पोलिसांनी विक्रमला बेड्या ठोकल्या. फायटर क्लब उघडण्यासाठी मी हे सगळे केले.
तलाठी कार्यालय फोडले परंतु प्रशिक्षण देण्यासाठी जागा योग्य नाही हे आत गेल्यावर कळले. मला देशाविषयी प्रचंड प्रेम असल्याने मी नवीन कुलूप त्याठिकाणी लावून निघून गेलो, अशी माहिती विक्रम याने चौकशीत दिली. दरम्यान, पोलिसांनी त्याचे ओळखपत्र जप्त केले असून त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली.