नियम धाब्यावर बसवून भरधाव वेगाने वाहनं चालवणं किती निष्पाप जीवांच्या जीवावर बेतू शकतं, याचा एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक प्रत्यय चांदवड-निफाड मार्गावर आला आहे. एका सुसाट कारने दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. हा सर्व थरार जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, अपघाताचं भीषण स्वरूप पाहून परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
advertisement
नेमकी घटना काय?
स्वाती कुंभार्डे असं मृत महिलेचं नाव आहे. स्वाती या नेहमीप्रमाणे आपल्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी पायी निघाल्या होत्या. त्याचवेळी चांदवड-निफाड मार्गावर पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव कारने आधी रस्त्यावरून जाणाऱ्या एका स्कुटीला जोरदार धडक दिली. ही धडक देऊन कार थांबली नाही, तर त्याच वेगात तिने पायी चालणाऱ्या स्वाती कुंभार्डे यांनाही उडविले.
महिलेचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक
या भीषण धडकेत स्वाती कुंभार्डे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे, कारने आधी ज्या स्कुटीला धडक दिली होती, त्यावरील संजय सावंद्रे हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
[video width="848" height="480" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/02/VID-20260225-WA0031-2026-02-a6c350f42dd965228a6277675c561f49.mp4"][/video]
चालक कार सोडून फरार
अपघात इतका भीषण होता की कारचंही मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर चालक जागीच कार सोडून फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून फरार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता या 'हिट अँड रन' प्रकरणातील आरोपी चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.
