या प्रयत्नांना सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कार्यरत असलेली वर्क फॉर कम्पॅशन (work for compassion) ही संस्था पुण्यात जनजागृती आणि सुरक्षित वाहतूक अभियान राबवत आहे. याविषयी माहिती शहानवाज पठाण यांनी लोकल 18 ला दिली आहे.
advertisement
शहानवाज पठाण यांनी सांगितले की वर्क फॉर कम्पॅशन ही संस्था गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कार्यरत आहे. जगातील 14 देशांमध्ये तसेच भारतातील 250 पेक्षा अधिक जिल्ह्यांत संस्था विविध उपक्रम राबवत आहे. पुण्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संस्थेने विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी दर आठवड्याला शहरातील विविध भागांत जाऊन वाहतूक नियमांबाबत माहिती दिली जाते.
पोस्टरच्या माध्यमातून नियम समजावून सांगितले जातात. तसेच नागरिकांनी वाहन चालवताना कोणत्या चुका टाळाव्यात, याविषयी मार्गदर्शन केले जाते. हेल्मेटचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचा सन्मान केला जातो. तर हेल्मेट न वापरणाऱ्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले जाते. याशिवाय सीटबेल्ट लावणाऱ्या वाहनचालकांचाही सन्मान केला जातो. असे अनेक समाजोपयोगी उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात.
आकडेवारी..
पुणे ट्रॅफिक पोलीस आणि पुणे महानगरपालिका (PMC) यांनी दिलेल्या अहवालानुसार, गेल्या चार वर्षांत रस्ते अपघातांत मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वात कमी नोंदवण्यात आली आहे. 2025 मध्ये (22 डिसेंबरपर्यंत) पुणे शहरात 302 जणांचा अपघातात मृत्यू झाला असून, ही संख्या 2023 आणि 2024 मधील 351 आणि 345 मृत्यूंच्या तुलनेत कमी आहे.
2022 मध्ये 325 मृत्यूंची नोंद झाली होती. अहवालांनुसार 2025 मध्ये हा आकडा 290 पर्यंत घसरल्याचेही सांगण्यात येत आहे. वाहनांची संख्या वाढत असतानाही मृत्यूंच्या संख्येत घट होणे दिलासादायक असले, तरी रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने अजूनही अधिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.





