गडकरींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी रविवारी रात्री उशिरापर्यंत एक महत्त्वाची 'मेराथॉन बैठक' पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, स्थानिक आमदार आणि भाजप कोअर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महायुतीऐवजी स्वबळावर लढण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
उमेदवारीसाठी 'सर्व्हे'चा आधार; जुन्या चेहऱ्यांना डच्चू?
advertisement
यावेळी निवडणुकीत भाजपने उमेदवारी देताना अत्यंत कडक निकष लावल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणाऱ्या आणि तगडा जनसंपर्क असलेल्या तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. निष्क्रिय नगरसेवकांचं तिकीट कापलं जाणार आहे. ज्या नगरसेवकांचा परफॉर्मन्स गेल्या ५ वर्षांत समाधानकारक नव्हता किंवा जे सर्वेक्षणात मागे पडले आहेत, त्यांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे.
याशिवाय ज्यांनी सलग २ ते ३ वेळा नगरसेवक पद भूषवलं आहे. त्यांना विश्रांती देऊन नव्या उमेदवारांना संधी दिली जाईल. मात्र, काही मोजक्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी पुन्हा मैदानात उतरवलं जाऊ शकतं. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्याने भाजप आजच आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.
युती तुटल्यास शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
भाजपने शिंदे गटाला अवघ्या ७ ते ९ जागांचा प्रस्ताव दिल्याचे समजते. हा प्रस्ताव शिंदे गटाला मान्य नसल्याने त्यांनीही सर्व जागांवर स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. जर असं झालं, तर नागपुरात भाजपला काही ठिकाणी फटका बसू शकतो. मत विभाजन होऊन याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो.
