कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, मोहपा गावातील रहिवासी सुभाष केशव भिवणकर हे गुरुवारी सकाळी आपली मुलगी तन्वी भिवणकर आणि तिची मैत्रीण वंशिका नरुळे यांना दुचाकीवरून उमरेड येथील परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी निघाले होते. बारावीचा महत्त्वाचा पेपर असल्याने तिघेही साडेदहाच्या सुमारास घरातून लवकर बाहेर पडले. मात्र, एमआयडीसी पुलाजवळ नियतीने घात केला.
विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे येणाऱ्या गिट्टीने भरलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी ट्रकच्या खाली चिरडली गेली. यात सुभाष भिवणकर आणि तन्वी यांचा जागीच मृत्यू झाला, तर वंशिका गंभीर जखमी झाली आहे.
advertisement
लोकांचा उद्रेक ट्रक पेटवला, पोलिसांवर दगडफेक
अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झाला. संतप्त जमावाने ट्रक चालक प्रफुल भोयर याला पकडून बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर, संतप्त नागरिकांनी ट्रकच्या केबिनला आग लावून आपला रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चालकाला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले, मात्र यावेळी जमावाने पोलीस गाडीवरही दगडफेक केली.
कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर
ज्या मुलीला परीक्षा केंद्रावर सोडून सुखरूप घरी परतायचे होते, त्याच मुलीचा आणि वडिलांचा मृतदेह पाहून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. भरधाव जड वाहनांच्या वेगामुळे आणखी किती बळी जाणार? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. उमरेड पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. जखमी विद्यार्थिनीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
