वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या परिसरात राहणाऱ्या एका पाचवीत शिकणाऱ्या मुलाचा वाढदिवस होता. मात्र हा वाढदिवस साजरा करण्यास त्याच्या आई वडिलांनी नकार दिला होता. त्यामुळे मुलगा प्रचंड नाराज झाला होता. तसेच रागा रागात तो घरातूनही निघून गेला होता. त्यानंतर नाराज झालेला मुलगा घरात कुठेच दिसत नसल्याने आई वडील चिंतेत पडले होते. त्यांनी तत्काळ मुलाची शोधाशोध सुरु केली होती. मात्र आई वडिलांना मुलगा कुठेच सापडला नाही.
advertisement
अखेर कुटुंबियांनी मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसाची मदत घेतली होती. त्यानंतर पोलीस पथकाच्या माध्यमातून मुलाचा शोध सुरू केला होता. यावेळी गस्तीवर असताना पथकाला मुलगा स्वामींनारायन मंदिर परिसरात मिळून आला होता. यावेळी मुलाने पोलिसांना वाढदिवस साजरा न केल्याने घर सोडून गेल्याची माहिती दिली. त्यावेळी पोलिसांना देखील मुलावर प्रचंड दया आली. आणि त्यानंतर संपूर्ण पथकाने मिळून मुलाचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांच संपूर्ण पथक मुलाच्या सोसायटीत पोहोचलं आणि त्यांनी मुलाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी मुलाची आई देखील या वाढदिवसात सामील झाली होती. वाढदिवस साजरा करताना मुलाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. या वाढदिवसानंतर पोलिसांनी मुलाला आई वडिलांकडे सुपूर्द केले. दरम्यान पोलिसांनी मुलाप्रती दाखवलेल्या या कृतीचे आता सर्व स्तरावर कौतुक होतं आहे.
