हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. ग्यारसी अमित यादव असं मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे. तर अमित यादव असं पतीचं नाव आहे. दोघंही पती-पत्नी मुळचे मध्यप्रदेशातील सिवनी येथील रहिवासी आहेत. मात्र मागील १० वर्षांपासून ते कोराडी नजीकच्या लोणारा येथे वास्तव्याला होते. घटनेच्या दिवशी दोघंही रक्षाबंधन असल्याने मोटारसायकलने लोणारा येथून देवलापारमार्गे करणपूरला जात होते.
advertisement
दरम्यान, ते देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत ग्यारसी या खाली पडल्या आणि बाजुने जाणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्या. ट्रकचं चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा सगळा प्रकार दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. दिवसाढवळ्या अपघात घडूनही त्यांच्या मदतीसाठी कुणी आलं नाही.
रस्त्यावर ग्यारसी यांचा मृत्यू झाल्याचं पाहूनही कुणीच मदतीसाठी आलं नाही. कुणीही वाहनं थांबवण्यास तयार झालं नाही. या प्रकारानंतर अखेर हतबल झालेल्या अमितनेपत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधला आणि त्याच्या घरी मध्यप्रदेशात नेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मदतीची याचना करूनही कोणतंही वाहन थांबलं नाही. मात्र मृतदेह दुचाकीवर घेऊन जाताना अनेकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र भीतीने तो थांबायला तयार नव्हता. याची माहिती महामार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी अमितला रोखलं आणि ग्यारसीचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवला. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
