दीपक सोळंके (मुख्य आरोपी), पवन साळुंके, करण साळुंके, विष्णू साळुंके आणि शंकर साळुंके असं गुन्हा दाखल झालेल्या पाच आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी आत्महत्येसं प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील रहिवासी होती. ती आपल्या बहिणीसह नांदेड शहरात खोली भाड्याने घेऊन राहत होती. ती दहावीत शिक्षण घेत होती. याच दरम्यान, तिची ओळख संशयित आरोपी दीपक सोळंके याच्याशी झाली. पण हीच ओळख तिच्यासाठी जीवघेणी ठरली आहे. दोघांमध्ये ओळख झाल्यानंतर आरोपी दीपकने या मुलीचे काही फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. बरेच दिवस दोघं चांगले मित्र होते.
advertisement
मात्र मागील काही दिवसांपासून मुलीने दीपकसोबत बोलणं बंद केलं होतं. बोलणं बंद केल्याचा राग मनात धरून दीपकने मुलीकडे लग्नासाठी तगादा लावला. इतकेच नाही तर, "माझ्याशी लग्न केले नाहीस तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन," अशी धमकी त्याने दिली. मागील बऱ्याच दिवसांपासून तो अशी धमकी देत होता. या सततच्या मानसिक छळामुळे आणि समाजात बदनामी होईल या भीतीने ही मुलगी प्रचंड दबावाखाली होती. अखेर २३ फेब्रुवारी रोजी रात्री तिने आपल्या राहत्या खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पाच जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद
या घटनेची माहिती मिळताच मुलीचं कुटुंब तातडीने नांदेडला आलं. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी दीपक साळुंकेसह पाच जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भाग्यनगर पोलीस करत असून, आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
