नांदेडमध्ये दोन गँग भिडल्या, पाच जणांचा मृत्यू
शुक्रवारी रात्री नांदेड शहरात दोन गँग आपसात भिडल्या. या गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू झाला. अनिल पंजाबी उर्फ सदा गँग आणि साई लाला गँगमध्ये वर्चस्व वादातून तिघांचा मृत्यू झाला. सदा गँगचा अर्जित सिंघ चव्हाण आणि साई लाला गँगचे महोमद अरबाज आणि सय्यद आवेझ असे तीन गुंड ठार झाले. हे प्रकरण शांत होत नाही तोच आज सकाळी पुन्हा सोनू कल्याणकर याचा खून झाला. याच खुनातील आरोपी पळून जात असताना पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडली.
advertisement
शिंदेसेनेचा पदाधिकारी सोनू कल्याणकर याची हत्या
सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेला शिंदेसेनेचा पदाधिकारी सोनू कल्याणकर याची अज्ञाताकडून हत्या करण्यात आली. शहरातील श्रीनगर भागात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात दहशत पसरली आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
तीन वर्षांपूर्वी सोनू कल्याणकर याच्यावर रिंदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे याने गोळीबार केला होता, त्यावेळी तो थोडक्यात बचावला होता. गोळीबार करणारा गोलू मंगनाळे सध्या जेलमध्ये असून आत्ता सोनूच्या हत्येमागे त्याचा सहभाग आहे का? याचा शोध नांदेड पोलीस घेत आहेत.
दरम्यान, नांदेडमधील गँगवॉरनंतर पोलीस दल सक्रीय झाले असून गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढल्याने पोलिसांना आता कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
